माणसाचं आयुष्य थोडं फार वांग्या सारखे असते. काही छोटे, गोरे-हिरवे गार, तर काही काळे कुट्ट. काही लांब आणि रुंद असून काळेच असतात. काही लठ्ठ-गोल असतात. काही गोड, गुणी असतात तर काही काटेरी, विषारी असतात. त्यांना खाल्याने अंगभर नुसती खाज सुटते. तोंडात फोड येतात. गोड, गुणी ह्यांची गोष्टच निराळी असते. चमकदार तर असतातच, वर चविष्ठ आणि गुणकारीही असतात.
पण एक गोष्ट सगळ्यां मधे सारखी असते, ते आहे त्यांचे सुंदर मुकुट.
वाह! राजेच अक्षरश:
बरं मग, माणसा मधे आणि ह्यांच्यात सारखेपणा कसा आणि कुठे असतो?
भेदानें सुरवात करूया. रंग, उंची, आकार, आणि गुण. शिवाय, जन्म घेणारा प्रत्येक माणूस - पुरुष किव्हा स्त्री, हे उरावर मुकुट घेऊनच येतात. घराण्याची शोभा वाढवितात. बरोबर ना? पुढे चालूया...
वांगे पिकल्या नंतर, विकायला ठेवले जातात, तसेच मुलं-मुली शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंदा करण्यास तयार होतात. वांगे घरात शिरून, उपयोगात आणताच, बाई त्यांचे मुकुट छाटून टाकते. भुट्टयांना तर चक्क अग्नी वर ठेऊन त्यांची कातडी जाळून टाकण्यात येते. पुढे काय होते, हे आपणास ठाऊक आहेच. छोटे, लांब-रुंद ह्यांना उभे, आडवे कापतात. कधी त्यांत मसाला भरून शिजवतात, तर कधी तेल, बटाटे, टमाटे, मटार, आणि छप्पन मसाले घालून उकडतात. काहींना चिरडून टाकतात.
आपल्या बरोबर साम्यता दिसतेय ना?
शिक्षण पूर्ण होताच, थकलेले, भागलेले, मुलं-मुली नोकरी-धंदाच्या शोधात घरा बाहेर निघतात. नशीब असेल तर चटकन काही तरी हाती लागतं, नाही, तर शिळ्या वांग्या सारखे एका टोपलीतून दुसर्या टोपलीत ट्रान्सफर होते.
भाजीवाला स्वताचे नुकसान होऊ देईल का? नाही! तेच शिळे वांगे तेल-पाणी लावून चमकावतो आणि विकायला ठेवतो. मग एखादा गरजू येतो आणि वाळके वांगे कमी दाम देऊन, अति आनंदात घरी जातो, कापतो, चिरतो, आणि पाणीदार रस्सा-भाजी बनवतो, मिटक्या मारत जळक्या भाकरी सोबत खातो.
आपल्या जीवनात सुद्धा असेच काही घडत असते, नाही का?
नेमकं काय होत - वांग्याचं भरीत का भरताचं वांग?
आता मी थांबतो. बरीच साम्यता दाखविली. याहून अधिक समानता असेलच.
थोडक्यात, सुग्रण उत्तम असेल तर वांगे चविष्ठ बनतील, मूर्ख किव्हा असमाधानी असेल तर बेत बिघडतो. तसेच, माणूस उत्तम गुण विकसित करेल तर देवाला भेटेल नाही तर उकिरड्यात सुद्धा 'नो-रूम' ची पाटी वाचावी लागेल.
आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.